२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टरांसाठी खुशखबर आहे.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक बनण्याचे पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.या नव्या बदलानुसार,अध्यापनाचा अनुभव नसताना किंवा किमान अनुभव असलेल्या डॉक्टरांना प्राध्यापक बनण्याची मुभा मिळणार आहे.
देशात दिवसेंदिवस वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने प्राध्यापकांची कमतरता जाणवत आहे.अशा स्थितीत वैद्यकीय संस्थांसाठीच्या ‘शिक्षक पात्रता योग्यता’ (टीईक्यू) मसुद्यात प्राध्यापक बनण्याचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पदव्युत्तर वैद्यकीय पदवीधारक बिगर शिक्षण सल्लागार, तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक बनण्याची मोकळीक दिली आहे.
किमान २२० खाटा असणारे शिक्षण किंवा बिगर शिक्षण रुग्णालयात किमान ४ वर्षे काम करणारे डॉक्टर प्राध्यापक बनण्यास पात्र असतील,असे आयोगाने स्पष्ट केले.उल्लेखनीय बाब अशी की, वर्ष २०२२ मध्ये जारी केलेल्या मापदंडात बिगर शिक्षण डॉक्टरांना ३३० खाटांच्या रुग्णालयात किमान २ वर्षे काम करणाऱ्या डॉक्टरांना सहाय्यक प्राध्यापक बनवण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र, रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतरित करण्यात आले असावे, अशी अट तेव्हा घालण्यात आली होती. आता हा नियम शिथिल करत किमान २२० खाटा असणाऱ्या शिक्षण किंवा बिगर शिक्षण रुग्णालयात किमान ४ वर्षे काम केलेले डॉक्टर हे प्राध्यापक बनण्यास पात्र असतील; पण त्यांना पात्र होण्यासाठी ‘जैव वैद्यकीय संशोधन मूलभूत अभ्यासक्रम’ (बीसीबीआर) पूर्ण करावा लागणार आहे. दरम्यान, ८ जून २०१७ पूर्वी वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून नियुक्त व त्याच संस्थेत सलग वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम करणारे डिप्लोमाधारक डॉक्टरसुद्धा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र असतील, असे ‘एनएमसी’ ने नव्या मसुद्यात स्पष्ट केले.