खात्यातून पैसे गायब केले तर ग्राहक नाही, बँक असेल जबाबदार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून हॅकरने किंवा अन्य कारणास्तव रक्कम काढून फसवणूक केली आणि त्यात ग्राहकाचा हलगर्जीपणा नसेल तर अशा परिस्थितीत त्याला बँक व्यवस्थापन जबाबदार असेल.

यासंदर्भात राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयाेगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आयाेगाचे न्यायाधीश सी. विश्वनाथ यांनी क्रेडिट कार्डामुळे एका अनिवासी भारतीय महिलेच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात बँक व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

एचडीएफसी बँकेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत आयाेगाने पीडित महिलेला ६,११० डाॅलरची (अंदाजे ४.४६ लाख रुपये) रक्कम १२ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

मानसिक छळ केल्याबद्दल पीडितेला नुकसान भरपाई म्हणून आणखी ४० हजार रुपये आणि केस खर्चासाठी ५,००० रुपये देण्याचे आदेश आयोगाने बँक व्यवस्थापनाला दिले आहेत.

न्या. सी. विश्वनाथ निर्णय देताना म्हणाले की, पीडितेचे क्रेडिट कार्ड इतर कुणी चोरले आहे याचा पुरावा बँक सादर करू शकली नाही.

या महिलेने हॅकरने आपल्या खात्यातून पैसे काढले आहेत आणि बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग यंत्रणेत त्रुटी आहेत असा दावा केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24