केंद्र आर्थिक व्यवस्थापनात अपयशी – पी. चिदंबरम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

हैदराबाद : अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर कडवट टीका केली आहे. ‘केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारने अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्याची आपली योग्यता नसून, याविषयी आपण असाहाय्य बनल्याचे सिद्ध केले आहे,’ असे ते म्हणालेत.

‘मोदी सरकारची अवस्था रुग्णाचा आजार शोधून त्यावर प्रभावी उपचार करण्यात अपयशी ठरलेल्या एखाद्या असाहाय्य डॉक्टरसारखी झाली आहे,’ असे पी. चिदंबरम शनिवारी काँग्रेसने येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना म्हणाले. ‘एकंदर स्थिती पाहता रुग्ण (अर्थव्यवस्था) अत्यंत कमकुवत झाला आहे. डॉक्टरने (सरकार) स्वत:ला अयोग्य सिद्ध केले आहे.

डॉक्टरकडून आजार ठीक करण्यासाठी करण्यात येणारे सर्वच उपचार अत्यंत निराशाजनक पद्धतीने चुकीचे आहेत,’ असे चिदंबरम म्हणाले. ‘माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यमसारखे लोक या आजारावर योग्य उपचार करणारे होते; पण सरकारने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला.

त्यामुळे आता आजाराचा शोध घेण्यात डॉक्टर पूर्णत: असाहाय्य बनला आहे,’ असे ते म्हणाले. ‘डॉक्टरकडे आता केवळ खेद व्यक्त करण्याचाच एक पर्याय उरला आहे. त्यांना आपली चूक मान्य करून डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे सल्ला मागावा लागेल,’ असेही चिदंबरम यावेळी म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24