Categories: भारत

पत्ते खेळण्यासाठी जमलेल्या चाळीस जणांना संसर्ग!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

विजयवाडा : वेळ घालविण्यासाठी ट्रकचालकांचा पत्ते खेळण्याचा नाद आंध्र प्रदेशातील विजयवाडा जिल्ह्यातील जवळपास ४० जणांच्या कोरोना संक्रमणाचे कारण ठरला.

अशा दोन घटनांमुळे चिंतेत वाढ झाल्याची माहिती कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी शनिवारी ही माहिती दिली. पहिल्या घटनेत विजयवाडा येथील कर्मिकानगर भागात संक्रमित ट्रकचालकामुळे इतर १५ जणांना कोरोनाची बाधा झाली.

तर काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुसऱ्या घटनेतही ट्रकचालकासह २४ जण अशाच प्रकारे एकत्र जमल्यामुळे कोरोनाबाधित झाले. या संक्रमितांमध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे.

पुरुष पत्ते खेळण्यासाठी एकत्र बसलेले असताना त्यांच्या कुटुंबातील इतर महिलांनीही एकत्र येत बैठे खेळ खेळले. १०० हून अधिक कोरोनाबाधित असलेला विजयवाडा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट आहे.

अशा स्थितीतही सामाजिक अंतराचा नियम न पाळल्यामुळेच संक्रमणाच्या घटना वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले.

अहमदनगर लाईव्ह 24