नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप व सत्तारूढ आम आदमी पक्षाकडून (आप) अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. यात, महिलांना दरमहा आर्थिक मदत, ३०० युनिट वीज मोफतसह अनेक आश्वासनांचा समावेश आहे.
याच घटनाक्रमात आता आपने दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देण्याचे वचन दिले आहे. तसेच मेट्रो रेल्वेत विद्यार्थ्यांना ५० टक्के सूट देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आणखी एका निवडणूक आश्वासनाची घोषणा केली आहे. यात, त्यांनी विद्यार्थी व नव मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर विद्यार्थ्यांना परिवहन बसमध्ये मोफत प्रवासाची मुभा देण्यात येईल. या सोबतच विद्यार्थ्यांना मेट्रो रेल्वे तिकिटात ५० टक्के सूट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘पढेंगे तभी तो आगे बढेंगे’, असे सांगत केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांना बस व रेल्वे प्रवासात सूट देण्याचे जोरदार समर्थन केले. दिल्लीमध्ये खूप लोक गरीब आहेत. त्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालय व विद्यापीठात जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची मुभा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीतील महिला व विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाचा लाभ मिळत आहे. पण यात विद्यार्थी मात्र मागे पडले होते. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांनासुद्धा बस प्रवास मोफत व मेट्रो रेल्वेत ५० टक्के सूट देण्याचे पाऊल उचलण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बहुतांश विद्यार्थी मेट्रोने प्रवास करतात. पण दिल्ली मेट्रो प्रचंड महाग आहे. मेट्रोचे तिकीट दर विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. मेट्रोतील लाभाचा ५० टक्के भाग केंद्राला तर ५० टक्के भाग दिल्ली सरकारला मिळतो. म्हणूनच मी पंतप्रधानांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याचा आग्रह केला आहे. हा निव्वळ जनहिताचा मुद्दा आहे.
केजरीवाल फक्त स्वप्न दाखवतात – काँग्रेस
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे जनतेला फक्त स्वप्न दाखवतात. पण, प्रत्यक्षात त्याची पूर्तता होत नाही. ते खोटे बोलण्यात निष्णात आहेत, असा टोला काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी शुक्रवारी लगावला. केजरीवालांनी स्वप्न निवडू नयेत तर त्यांनी वस्तुस्थितीला निवडले पाहिजे, असेही ते म्हणाले. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संदीप दीक्षित यांनी केजरीवालांवर निशाणा साधला.