अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन रविवारी ३९ व्या दिवशीही सुरू होते. हाडे गोठवणारी थंडी, पाऊस, रस्त्यावर साचलेला चिखल,
गळणारे तंबू, भिजलेली पांघरुणे आणि लाकडे अशा अवस्थेतही शेतकरी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ठाण मांडून आहेत.
सिंघू आणि टिकरी बाॅर्डरवर आणखी ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात एका १८ वर्षीय युवकाचाही समावेश आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान आतापर्यंत आत्महत्या आणि इतर कारणांमुळे ५४ शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य अभिमन्यू कोहार यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला होता.
बचावासाठी शेतकऱ्यांनी वाॅटरप्रूफ तंबूंची व्यवस्था केली आहे.पण थंडी आणि पाणी साचणे या समस्यांपासून शेतकऱ्यांना हे तंबू वाचवू शकत नाहीत. आं हरियाणात टिकरी बाॅर्डरवर धरणे देत असलेल्या बठिंडा येथील १८ वर्षीय जश्नप्रीतसिंह याची शनिवारी रात्री उशिरा अचानक प्रकृती बिघडली.
त्याला सिव्हिल हाॅस्पिटल आणि नंतर पीजीआयला नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धरणे आंदोलनात सहभागी असलेले हरियाणाच्या जिंद येथील ६६ वर्षीय जगबीर यांचा मृतदेह ट्राॅलीत आढळला.
सिंघू बाॅर्डरवर सोनिपतचे बलवीरसिंह आणि पंजाबच्या लिदवां येथील निर्भयसिंह हे शनिवारी रात्री तंबूत झोपले होते. रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. आणखी एका शेतकऱ्याला हार्ट अटॅक आला आहे.