अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केला आहे.
तसेच ते म्हणाले की,उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी रोजी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
या महाराष्ट्र बंदमध्ये राष्ट्रवादी देखील उतरणार आहे. उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय, हक्कासाठी आंदोलन करुन आपले म्हणणे केंद्रातील मोदी सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
परंतु वेळोवेळी हे आंदोलन भाजप सरकारतर्फे भरकटविण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यामध्ये त्यांना पूर्णत: यश आलेले नाही. शेवटी हे आंदोलन दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविलेला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून टाकण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय व तीव्र चीड आणणारा आहे.
भारत कृषिप्रधान देश असताना या देशात शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळत आहे. अशावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून,
या निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.