अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- आज 25 डिसेंबर 2020 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधणार आहेत आणि त्याचवेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
प्रधानमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आज एका बटणाच्या मदतीनं एकाचवेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करणार आहे.
नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. तीन हप्त्यांत 2000 रुपये दर चार महिन्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करतील.
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी 6 राज्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि किसान कल्याण निधी, शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या इतर उपक्रमांविषयी त्यांचे अनुभव सांगतील.
यावेळी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी. इतर भाजपा नेते देशभरातून पक्षाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये भाग घेतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
एकीकडे हे सर्व सुरु असताना दुसरीकडे दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ शेतकरी तीन कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करीत असताना भाजपने हा कार्यक्रम आयोजित केलाय. शेतकरी हे कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असून, सरकारने ही मागणी पूर्णपणे नाकारली आहे.