उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील तरुण किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि लग्नच करुन आला. हे प्रकरण येथेच थांबे नाही तर हे पाहून त्याची आई बेशुद्ध पडली. त्यानंतर घरात बराच वाद झाला.
अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत न्यावं लागलं. अखेर या सर्व प्रकरणावर संमतीने तोडगा काढण्यात पोलिसांना यश आले. या तरुणाचे गुड्डू आणि त्याच्या बायकोचे नाव सविता आहे.
गुड्डू भाजी आणि किराणा माल आणायला जात असल्याचे सांगून हा तरुण आपल्या प्रेयसीशी लग्न करुन थेट तिला घरी घेऊन आला. मात्र त्याच्या आईने दोघांनाही घरात घेण्यास नकार दिला.
पोलिसांत हे प्रकरण गेल्यानंतर गुड्डूची चौकशी करण्यात आली असता त्याने आम्ही मंदिरामध्ये लग्न केल्याचे पोलिसांना सांगितलं. मात्र या लग्नाचा कोणताही पुरावा मुलाला सादर करता आला नाही.
दोन महिन्यापूर्वी हरिद्वारमधील आर्य समाज मंदिरात आम्ही लग्न केल्याचा दावा या मुलाने केला आहे. मात्र साक्षीदार नसल्याने त्यावेळी आम्हाला लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) बनवता आलं नाही.
मी हरिद्वारला हे सर्टिफिकेट घेण्यासाठी जाणार होतो मात्र लॉकडाउनमुळे मला जात आला नाही, असं या मुलाने पोलिसांना सांगितलं. गुड्डू आणि त्याच्या पत्नी सविता हिने भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सविता ही दिल्लीमध्ये भाडेतत्वावर राहत होती. मात्र लॉकडाउनच्या कालावधीमध्येच तिच्या घरमालकाने तिला घर खाली करण्यास सांगितलं. त्यामुळेच गुड्डूने तिला घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या घरमालकाला लॉकडाउनसंपेपर्यंत या दोघांना या घरात राहू देण्यास सांगितलं आहे.