अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आंध्र प्रदेशातील तिरपती देवस्थान सर्वांना माहिती आहेच. तिरुपती परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने पूरस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे
तिरुपती शहरात असलेल्या सर्वात मोठ्या जलाशयाला तडे गेल्याची शंका व्यक्त करण्यात आल्याने, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
तूर्त पावसाने उघडीप घेतली असली, तरी पूरस्थितीमुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, तर अनेक रस्ते पावसात वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
काही गावे अजूनही पाण्याखाली आहेत. तिरुपतीच्या रामचंद्रपूरममध्ये रायला चेरवूच्या आसपास धरणाला तडे गेल्याची माहिती आहे. यातून पाणी बाहेर आल्यास आसपास असलेली गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गरजेच्या वस्तू घेऊन परिसरातील नागरिकांना उंच स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या परिसरात फिरुन अधिकारी नागरिकांना धोक्याची सूचना देत आहेत.
धरण फुटण्याची भीती असल्याने, नागरिकांनी गाव रिकामे करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते आहे. आपल्या परिसरातील नातेवाईकांनाही याची माहिती देण्यात यावी, असे सांगण्यात येते आहे.
चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला डोंगरातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी बाहेर वाहून येते आहे, यामुळे स्वर्णमुखी नदीला मोठा पूर आला आहे. या परिसरातील जलाशय आणि धरणांच्या मातीत मोठी दलदल निर्माण झाली आहे.
आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. कडपा आणि अनंतपुरमू जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण बेपत्ता आहेत.