Chandrayaan : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरने तेथील तापमानाच्या आलेखाच्या रूपाने पहिली शास्त्रीय माहिती पाठवली. त्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तब्बल ५० अंश सेल्सिअस आहे, तर पृष्ठभागापासून अवघ्या ८ सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे.
भारताच्या चांद्रयान- ३ मोहिमेमुळे चंद्राच्या तापमानातील ही मोठी तफावत प्रथमच जगासमोर आली असून जगभरातील शास्त्रज्ञांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने रविवारी चंद्रावरील तापमानाचा एक आलेख आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला.
विक्रम लँडरवरील ‘चंद्र सर्फेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट’ अर्थात चेस्टा नामक पेलोडने तापमानाचे केलेले मोजमाप या आलेखात नमूद करण्यात आले आहे. चेस्टवर तापमान मोजण्यासाठी लावलेले यंत्र जमिनीखाली १० सेंटीमीटर खोलीपर्यंतचे तापमान मोजण्यास सक्षम आहे.
याशिवाय लँडरवर तापमान मोजणारे १० सेन्सर्स देखील आहेत. इस्रोचे शास्त्रज्ञ बीएचएम दारुकेशा यांनी या माहिती अचंबित करणारी असल्याचे सांगितले. चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २० अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान असेल, असा आमचा अंदाज होता.
परंतु ते आमच्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक निघाले, असे दारुकेशा म्हणाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाबाबतचा हा पहिलाच आलेख असून विस्तृत अभ्यास सुरू असल्याचे इस्रोने सांगितले.
चेस्टा हे शास्त्रीय उपकरण अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या (पीआरएल) सहकार्याने इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील अंतराळ भौतिकी प्रयोगशाळेच्या चमूने तयार केले आहे.
लँडरवरील रंभा पेलोडद्वारे तेथील खनिजांची तर इल्साद्वारे चंद्रावरील भूकंपाची माहिती मिळवण्यात येईल. दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश हा फार अल्पकाळ असतो. येथील काही विवरांमध्ये तर सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही. या ठिकाणी बर्फाच्या रूपात पाणी असण्याचे संकेत चांद्रयान-१ मोहिमेतून मिळाले होते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मुबलक प्रमाणात पाणी असल्याचे सिद्ध झाले तर भविष्यात येथे मानवी वस्ती वसवण्यास मदत होईल. तसेच पाण्याच्या अणुतून हायड्रोजन वेगळा करून भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी इंधन मिळवता येईल.
आलेखानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाचे तापमान सुमारे ५० अंश सेल्सिअस इतके आहे, तर चंद्राच्या पृष्ठभागाच्या खाली जाताच तापमानात मोठी घट होते. पृष्ठभागाखाली अवघ्या ८ सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे १० अंश सेल्सिअस इतके कमी आहे.