IMD Alert : वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्यामुळे आता पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काही भागात उष्णतेत वाढ झाली आहे तर काही भागातील तापमानात घट झाली आहे.
येत्या ३ तारखेपर्यंत देशातील विविध भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे हवामानात हा बदल पाहायला मिळत आहे.
आज दिल्लीत किमान तापमान 19 अंश आणि कमाल तापमान 32 अंश नोंदवले गेले. मात्र, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज राजधानीच्या अनेक भागात हलका पाऊसही दिसला. त्यामुळे पुढील काही दिवस ढगांच्या गडगडाटाची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून म्हणजेच 31 मार्चपासून सक्रिय होणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे एप्रिलच्या सुरुवातीस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगाल आणि देशातील अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ३१ मार्चपासून जम्मू-काश्मीरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे देशभरातील राज्यांमध्ये बदल दिसून येतील.
IMD च्या हवामान अंदाजानुसार 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये देखील वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावा पाहायला मिळू शकतो. हवामान खात्याने 31 मार्च रोजी धौलपूर, भरतपूर, करौली, सवाई माधोपूर, अलवर, दौसा आणि झुंझुनू येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर ३ एप्रिलपासून आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हवामान तसेच तापमानात मोठा बदल होईल.
गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा आणि फळबागांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याने हवामान खात्याकडून रब्बी पिकांची काढणी लवकरात लवकर करण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.