अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- भारतीय संघाच्या १९ वर्षाखालील संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताने इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा आव्हानांचा सहा गडी गमावत यशस्वी पाठलाग केला.
भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगउलट आला.
भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८९ धावांत आटोपला. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
मात्र पुन्हा डाव सावरत भारतने विजयाकडे आगेकूच केली. या विजयात निशांत सिंधु ५० (५४ चेंडू), शेख रशिद ५० (८४ चेंडू), राज बावा ३५ (५४चेंडू) यांनी बहुमोल कामगिरी बजावली.
सर्वच खेळाडुंच्या योगदानाच्या जोरावर या तरुण भारतीय संघाने पाचव्यांदा विश्वविजयी होण्याचा बहुमान मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता.
त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.