ISRO Sun mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी सौर मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य-एल१’ ही भारताची पहिली अंतराळ प्रयोगशाळा प्रक्षेपित करण्यात येईल. इस्त्रोने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.
आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून २ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी ‘आदित्य- एल१’ अवकाशात झेपावेल. या प्रक्षेपणासाठी पीएसएलव्ही-सी ५७ रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे.
सूर्याच्या अभ्यासासाठी भारताची ही पहिली समर्पित अंतराळ मोहीम आहे. सौर कोरोना अर्थात सूर्यावरील बाह्य आवरणाचे दूरस्थ अवलोकन आणि एल-१ (सूर्य – पृथ्वी लॅग्रेज बिंदू) वर सौर हवेच्या यथास्थितीचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
एल-१ पृथ्वीपासून १५ लाख किमीवर आहे. लॅग्रेंज बिंदूवर सूर्य व पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आकर्षण व प्रतिकर्षणाचे वर्धित क्षेत्र निर्माण करते. नासानुसार या क्षेत्रातील स्थितीचा उपयोग करून अंतराळ यान कमीत कमी इंधनाचा वापर करत तेथे कार्यरत राहू शकते. इटालियन-फ्रान्सिसी गणिततज्ज्ञ जोसेफी लॅग्रेज यांच्या सन्मानार्थ या बिंदूचे नामकरण करण्यात आले आहे.
‘आदित्य- एल१’ हे सौर एक प्रकारची प्रयोगशाळा आहे. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून एल-१ केंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर या बिंदूच्या चारही कक्षांमधून सूर्याचा अभ्यास करणे या मोहिमेचा उद्देश आहे.
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६ हजार अंश सेल्सिअस आहे.तापमानात एवढा प्रचंड फरक का आहे, याची माहिती या मोहिमेद्वारे मिळवण्याचा इस्त्रोचा प्रयत्न आहे. ही सौर मोहीम पूर्णपणे स्वदेशी असून देशातील काही संस्थांच्या सहभागातून ती तयार झाली असल्याचे इस्त्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
या अंतराळ यानासोबत सात पेलोड अर्थात शास्त्रीय अभ्यासासाठी उपकरणे पाठवण्यात येणार आहेत. सातपैकी चार पेलोड थेट सूर्याचे निरीक्षण करतील. पुण्यातील खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्राचे आंतरविद्यापीठ केंद्राने सूर्यावरील अतिनील किरणांचा अभ्यास करण्यासाठीचे उपकरण तयार केले आहे.
या उपकरणाच्या मदतीने सोलार क्रोमोस्फियर आणि कोरोना यांचे निरीक्षण करण्यात येईल. तर बंगळुरूतील भारतीय खगोलभौतिकशास्त्र संस्थेने व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ पेलोड विकसित करण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे.
लॅग्रेन बिंदूवरून ग्रहण किंवा तत्सम कोणत्याही अडथळ्याशिवाय सातत्याने सूर्याचे निरीक्षण करता येईल. त्यामुळे सूर्यावरील घडामोडींचा आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यास मदत होणार असल्याचे इस्रोने सांगितले.