Chandrayaan-3 : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हरचे अलगद अवतरण केल्यापासून संपूर्ण जगात इस्त्रोचा आणि चांद्रयान- ३ मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या किंवा या ऐतिहासिक कामगिरीमध्ये योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचे खूप कौतुक होत आहे.
इस्रोच्या टीमने केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. पण यादरम्यान एक असे वृत्त आले आहे जे आपल्याला अस्वस्थ करणारे आहे.
या चांद्रयान- ३ मध्ये योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांमधील एक तंत्रज्ञ आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह चालवण्यासाठी रस्त्यावर ठेला लावून इडली विकण्याची परिस्थिती ओढवली आहे.
चांद्रयान- ३ च्या यशाने जगात सर्वत्र भारतीय शास्त्रज्ञांचा डंका वाजत आहे. इस्रोच्या या यशामध्ये अमेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा तंत्रज्ञांमधील एक आहेत दीपक कुमार उपरियारिया यांनी चांद्रयान- ३ चे लाँचपॅड निर्माण करण्यासाठी काम केले आहे.
मात्र, आता ते रांचीमध्ये रस्त्यावर ठेला लावून इडली विकत आहेत. रांचीच्या धुर्वा परिसरात जुन्या विधानसभा इमारतीच्या समोर त्यांनी रस्त्याच्या कडेला हा ठेला लावला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, चांद्रयान-३ साठी फोल्डिंग प्लॅटफॉर्म आणि स्लायडिंग गेट बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये उपरियारिया यांनी तंत्रज्ञ म्हणून काम केले होते.
या कंपनीने मागील १८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपरियारिया यांना रस्त्यावर इडली विकण्याची नामुष्की ओढवली आहे.