Kedarnath Dham : चार धाम यात्रा २०२३ ला सुरुवात झाली आहे. यावर्षी देखील हजारो भाविक दररोज चार धाम यात्रा करत आहेत. तसेच लाखो भाविकांनी चार धाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे. तेथील खराब वातावरणामुळे २ वेळा यात्रा थांबवण्यात आली होती.
केदारनाथ धाम हे उंचीवरील ठिकाण असल्याने अनेकांना या ठिकाणी गेल्यानंतर समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे अशा लोकांनी आरोग्याच्या टेस्ट करून घेणे कधीही फायदेशीर मानले जाते. केदारमधील अनेक रहस्यमय गोष्टी पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक याठिकाणी जात असतात.
चार धाम मधील हिंदूंचे महत्वाचे मानले जाणारे केदारनाथ धाम २५ एप्रिल रोजी उघडण्यात आले आहे. केदारनाथ हे हिंदूंसाठी अतिशय पवित्र स्थान मानले जाते. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार येथे भगवान शिव स्वतः वास करतात.
केदारनाथ धामबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. तसेच केदारनाथ धामबद्दल अनेक धार्मिक गोष्टी सांगितल्या जातात. आज तुम्हाला केदारनाथ धामबद्दल अशाच काही रहस्यमय गोष्टी सांगणार आहोत.
केदारनाथ धामशी संबंधित 5 मोठ्या गोष्टी
केदार शब्दाचा अर्थ पर्वत, तर नाथ म्हणजे स्वामी. धार्मिक मान्यतेनुसार केदारनाथ म्हणजे पर्वतांचा देव, जे भगवान शिव आहेत. सर्वात उंचावर असलेले हे भगवान शिव यांचे स्वयंभू शिवलिंग आहे.
भूवैज्ञानिकांच्या मते केदारनाथ मंदिर ४०० वर्षे बर्फामध्ये होते. तसेच या मंदिराबद्दल कोणालाही माहिती नव्हते. त्यामुळे या ठिकाणी त्यावेळी कोणीही जात नसायचे तसेच भगवान शिव यांचा या ठिकाणी वास आहे हे देखील माहिती नव्हते.
रुद्रावतार भैरवाला केदारनाथ धामचे संरक्षक देवता मानले जाते. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सर्व यात्रेकरूंनी त्यांचे दर्शन घेणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे बंधनकारक आहे.
बद्रीनाथला जाण्यापूर्वी सर्व यात्रेकरूंना केदारनाथचे दर्शन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. बद्रीनाथ धामपासून एक गुप्त मार्ग थेट केदारनाथ धामला जोडतो.
केदारनाथचे मुख्य पुजारी हे दक्षिण भारतातील वीरशैव पंथाचे आहेत. मुख्य पुजाऱ्याचे काम इतर सहयोगी पुरोहितांना मार्गदर्शन करणे आहे.