Categories: भारत

डॉ.मनमोहन सिंगांना पाकचे निमंत्रण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मुद्यावरून ‘भारत-पाक’मधील तणाव टोकाला पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर पाकने आपल्या हद्दीतील करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी या कॉरिडोरचे उद्घाटन होणार आहे.

दरम्यान, मनमोहन या कार्यक्रमाला जाणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, सूत्रांनी ते जाणार नसल्याचा दावा केला आहे. पाक परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी सोमवारी करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. या कॉरिडोरद्वारे पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वाराला पाकच्या हद्दीतील करतारपूरस्थित दरबार साहिब गुरुद्वाराला जोडण्यात आले आहे.

प्रस्तुत प्रकल्पामुळे भारताच्या ५ हजार शीख भाविकांना दररोज विनाव्हिसा करतारपूर साहिबांचे दर्शन घेता येणार आहे. ‘करतारपूर कॉरिडोर उद्घाटन समारंभ एक मोठा कार्यक्रम आहे. त्याची पाकमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. सरकारने या कार्यक्रमासाठी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रण पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या वतीने परराष्ट्रमंत्री म्हणून मी स्वत: त्यांना निमंत्रण देईल. याशिवाय सरकारही त्यांना याविषयी औपचारिक निमंत्रण पत्र पाठवेल.

सिंग शीख समुदायाचे एक प्रतिष्ठित नेते असून, ते आपल्या समुदायाचे नेतृत्व करतील’, असे कुरेशी ‘कॅपिटल टीव्ही’शी बोलताना म्हणाले. ‘गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त करतारपूरला येणाऱ्या शीख भाविकांचे स्वागत करताना आम्हाला आनंदच होईल’, असेही ते यावेळी म्हणाले. गुरुनानक यांची जयंती १२ नोव्हेंबर रोजी आहे.

तत्पूर्वी, ९ तारखेला या कॉरिडोरचे उद्घाटन केले जाणार आहे. दुसरीकडे, मनमोहन या कार्यक्रमासाठी पाकला जाण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. ‘मनमोहन यांनी आपल्या १० वर्षांच्या कारकीर्दीत केव्हाही पाकला भेट दिली नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24