अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
डेथ वॉरंटला स्थगिती देण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर एक दोषी मुकेशने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून दया याचिका प्रलंबित असल्याने फाशीची तारीख लांबविण्याची विनंती केली. दिल्ली सरकारने मुकेशची दया याचिका फेटाळण्याची शिफारस केली आहे.
त्याचवेळी दया याचिका प्रलंबित असल्याने डेथ वॉरंटनुसार निर्धारित केलेल्या २२ तारखेला फाशी देणे अशक्यप्राय असल्याचे सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले. निर्भया प्रकरणातील चारपैकी एक दोषी मुकेशने डेथ वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याची याचिका बुधवारी हायकोर्टाने फेटाळून लावली. मात्र,
त्याचवेळी त्याला कनिष्ठ न्यायालयात जाण्याची सूट दिली. याचा फायदा उचलत मुकेशने तत्काळ पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली. आपली दया याचिका प्रलंबित असल्याने डेथ वॉरंटच्या अंमलबजावणीची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी मुकेशने केली आहे. त्याच्या या याचिकेवर गुरुवारी न्यायालय सुनावणी करेल.
तत्पूर्वी दिल्ली सरकार आणि तिहार तुरुंगाच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितले की, मुकेशची दया याचिका प्रलंबित असल्याने कोणत्याही दोषीला २२ तारखेपर्यंत फाशी देता येणार नाही. तसेच इतर दोषींकडूनही दया याचिका दाखल करण्याच्या आणि त्या निकाली निघण्याची वाट बघावी लागेल.
सर्वांच्या याचिका २२ तारखेपूर्वी जरी निकाली निघाल्या तरी नव्याने डेथ वॉरंट काढावे लागेल, असे सरकारी वकिलांनी हायकोर्टाला सांगितले. यावरून हायकोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला फटकारले. दिल्ली सरकारने मुकेशची दया याचिका फेटाळण्याची शिफारस गृहमंत्रालयाला केली आहे.