अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- नगरची निशिगंधा जिवडे या युवतीने फॅशनच्या दुनियेत नगरचे नाव राखले. दिल्लीत नुकत्याच झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत तिने उप विजेती होण्याचा मान पटकावला. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील स्कायवॉक प्रॉडक्शनमार्फत मिस इंडिया २०२० स्पर्धा नुकतीच दिल्लीत घेण्यात आली.
यात नगर शहरातील मराठमोळी कन्या निशिगंधा नंदकुमार जिवडे सहभागी झाली होती. तिने विविध स्पर्धांतून चमक दाखवून स्पर्धेचे उप विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल विविध स्तरांतून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. निशिगंधा ही १८ वर्षाची असून मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये ती सर्वांत लहान प्रतिस्पर्धी होती.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये संपूर्ण भारतातून निवडलेल्या ५० मुलींमध्ये निशिगंधा हिने “मिस एलिगेंस 2020” हा किताब मिळवून मिस इंडिया स्पर्धेत उपविजेती ठरली. अंतिम फेरीत निर्माता-दिग्दर्शक अरबाज खान परीक्षक होते. निशिगंधा येथील अॅड. नंदकुमार जिवडे यांची कन्या आहे.
भारतात बॉलिवुडचा मोठा प्रभाव असताना मराठमोळ्या निशिगंधा हिने ग्रँड फायनलपर्यंत मजल मारणे ही महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. आप्तेष्ट, मित्रमंडळी, हितचिंतक यांनी ऑनलाईन पद्धतीने वोटिंग करून तिला भरघोस पाठिंबा दिला.
तिच्या या यशाबद्दल सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे, पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी, आयकर आयुक्त महेश जिवडे, चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,
उद्योजक चंद्रकांत जिवडे, राज्य परिवहन महामंडळातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अमोल कोतकर, अखिल भारतीय मराठी सोयरीक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे आदींनी तिचे कौतुक केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved