अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रे संपूर्णपणे बंद होते. यात मायानगरी अर्थात सिनेनगरीही बंद होती. सर्वच चित्रपट, मालिका यांचे शूटिंग थांबले होते.
मागील आठवडय़ात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती केली होती.
त्यानुसार चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास सशर्त मान्यता देण्यात आली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ चित्रीकरण बंद असल्याने अनेक चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण रखडले आहे.
अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले असले तरी पोस्ट प्रॉडक्शनची कामे खोळंबली आहेत. या सगळ्या कामांना गती मिळावी, यासाठी मराठी कलाकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता.
त्यानंतर इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे सदस्य आणि काही निर्मात्यांचीही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी संबंधित प्रत्येक विभागात काय काळजी घेऊन चित्रीकरण करता येईल, यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे,
उपाययोजना यांचे ३७ पानी सादरीकरण केले होते. या सगळ्यावर विचारविनिमय करून शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्मात्यांना या परवानग्या देण्यात आल्या आहेत.
चित्रीकरणासाठी करावा लागेल अर्ज चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळाव्यात, अशी विनंतीही निर्मात्यांकडून करण्यात आली होती.
सध्या चित्रीकरणाच्या कामांना परवानगी मिळवण्यासाठी निर्मात्यांना मुंबईत गोरेगाव येथील चित्रनगरीत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अर्ज करावे लागतील,
तर उर्वरित जिल्ह्य़ांतील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews