PM Narendra Modi : शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये फायदा होत आहे. ही मोदीची गॅरंटी आहे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Narendra Modi : आपले सरकार कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये फायदा होत आहे.

ही मोदीची गॅरंटी आहे, नुसते आश्वासन नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शनिवारी आयोजित १७ व्या भारतीय सहकारी काँग्रेसला संबोधित करताना ते बोलत होते. निवडणूक काळात देण्यात येणाऱ्या आश्वासनांवरून मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

मोदींनी खतांवरील अनुदान, धान्य खरेदी, पीएम किसान योजनांचा उल्लेख केला. बांगलादेशात युरियाची बॅग (७२० रु.), पाकिस्तानात ( ८०० रु.), चीनमध्ये (२१०० रु.) तर अमेरिकेत (३०००रु.) असताना भारतात ती अवघी २७० रुपयांना मिळते.

सरकारने गतवर्षी खतांच्या अनुदानासाठी १० लाख कोटी रुपये खर्च केले. सरकारने हमीभावावर मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी केली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना गत चार वर्षांपासून सुमारे अडीच लाख रुपये देण्यात आले आहेत.

यापेक्षा मोठी गॅरंटी काय असते? असे पंतप्रधान म्हणाले. सहकार संस्था कायद्यात दुरुस्तीसाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

सिकलसेल ॲनिमिया उच्चाटन मोहीम सुरू

पंतप्रधानांनी शनिवारी मध्य प्रदेशच्या शहडोल येथे आयोजित कार्यक्रमात एका पोर्टलचे अनावरण करत राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया उच्चाटन मोहिमेची सुरुवात केली. २०४७ पर्यंत देशाला सिकलसेल अॅनिमियापासून मुक्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

जगात या आजाराचे जेवढे रुग्ण आढळतात त्यापैकी अर्धे भारतात आढळत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. गत ७० वर्षांत या आजाराची दखलच घेण्यात आली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सिकलसेल ॲनिमिया हा अनुवांशिक आजार आहे. या आजारात रक्तपेशींचा आकार बदलून तो विळ्यासारखा होतो. हा आजार असलेले रुग्ण अल्पायुषी असतात.