अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- दिल्लीतील हिंसाचार आणि इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’मध्ये काय बोलणार याकडे जनतेचं लक्ष होतं. पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’मधून दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला.
पण पंतप्रधांनी शेतकरी आंदोलनावर थेट बोलणं टाळलं आहे. नव्या वर्षातील पंतप्रधान मोदींची पहिली मन की बात होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “26 जानेवारी रोजी झालेला तिरंग्याचा अपमान पाहून फारच दुखी झालो. दिल्लीत शेतकरी आंदोलनात २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला.
लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला गेला. ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दुखी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “राष्ट्रपतींनी संयुक्त सत्राला संबोधित केल्यानंतर ‘बजेट सत्र’ सुरु झालं आहे.
अशातच आणखी एक गोष्ट घडली, ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो, ती म्हणजे पद्म पुरस्कारांची घोषणा. यंदाही पद्म पुरस्कारांच्या यादीत त्या लोकांचा समावेश आहे, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केलं आहे. आपल्या कार्यानं अनेकांचं जीवन बदललं आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या महिन्यात भारतीय क्रिकेट संघानेही चांगली कामगिरी केली. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीला अनेक खचता खाल्यानंतर, शानदार वापसी करत ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेली मालिका आपल्या नावे केली. आपल्या खेळाडूंचं परिश्रम आणि एकता प्रेरणा देणारी आहे.