अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू- काश्मिरात आयुष्मान भारत योजना लाँच केली. त्यात सर्व रहिवाशांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात मोदी म्हणाले, दिल्लीत काही जण मला शिव्याशाप देत असतात, माझ्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरतात. जम्मू-काश्मिरात निवडणूक (डीडीसी) यशस्वीपणे पार पडली.
हे तेच लोक आहेत, जे मला लोकशाहीवर भाषण देतात. मात्र, हेच लोक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही पुद्दुचेरीत पंचायत व नगरपालिका निवडणुका होऊ देत नाहीत.
मोदी म्हणाले की, जे मोदींना लोकशाही शिकवतात त्यांच्या वागण्या व बोलण्यात किती अंतर आहे, ते लोकशाहीबाबत किती गंभीर आहेत हे पुद्दुचेरीच्या उदाहरणातून दिसून येते.
तेथे पंचायत आणि नगरपालिका शेवटची निवडणूक २००६ मध्ये झाली होती. त्यांचा कार्यकाळ २०११ मध्ये संपला. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये निवडणूक घेण्याचे आदेश दिले तरीही आतापर्यंत तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत.
दुसरीकडे जम्मू- काश्मिरात डीडीसी (जिल्हा विकास परिषद) निवडणूक नुकतीच पार पडली. यात मतदारांनी उत्साहाने भाग घेतला. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण होता.