भारत

यमुनेचे पाणी विषारी असल्याचे पुरावे द्या ; निवडणूक आयुक्तांचे केजरीवालांना पत्र

Published by
Sushant Kulkarni

३१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यमुनेच्या पाण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यमुनेचे पाणी विषारी असल्याचे पुरावे द्यावेत अन्यथा कारवाईचा सामना करावा,असे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी बजावले आहे.यमुनेच्या पाण्यावरून त्यांनी केजरीवालांना पाच प्रश्न विचारत त्याचे उत्तर मागवले आहे.परंतु,निवडणूक आयुक्त राजकारण करीत असून त्यांनी दिल्लीतून निवडणूक लढवून दाखवावी,असे आव्हान केजरीवाल यांनी दिले आहे.

हरियाणात यमुना नदीच्या पाण्यात प्राणघातक अमोनियाचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केजरीवालांना पत्र पाठवत जाब विचारला आहे.त्यामुळे दोघांमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे.

यमुनेच्या पाण्यात कोणते विष मिसळण्यात आले? त्याचे पुरावे द्यावेत ?

नेमक्या कोणत्या ठिकाणी विष मिसळण्यात आले,त्याचा खुलासा करावा ? जल मंडळाच्या कोणत्या अधिकाऱ्याला यमुनेच्या पाण्यात विष आढळून आले ? यमुनेच्या पाण्यातील विष रोखण्यासाठी अभियंत्यांनी कोणता फॉर्म्युला अमलात आणला ? अशा सवालांची सरबत्ती निवडणूक आयुक्तांनी केली.अरविंद केजरीवाल यांनी येत्या शुक्रवार पर्यंत (३१ जानेवारी) उत्तर द्यावे.

अन्यथा कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी ठणकावले. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी यमुनेच्या पाण्यावरून स्वतःला धारेवर धरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला.दिल्लीत मतदारांना पैसे व चादर वाटले जात आहेत.पण,आयोग गप्पगार आहे.आता राजीव कुमार १८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत.

त्यानंतर त्यांना नोकरी पाहिजे.त्यांनी आताच आयोगाचा कचरा केला.मला पाठवलेल्या पत्रात कुमार यांनी वापरलेली भाषा हे आयोगाचे काम नाही.इतिहास त्यांना माफ करणार नाही.जर खरोखरच राजीव कुमार यांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी दिल्लीच्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले.

आम्ही यमुनेच्या पाण्याच्या तीन बॉटल मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवणार आहोत. हे पाणी त्यांनी पत्रकार परिषदेत पिऊन दाखवावे.तरच आम्ही आमचे आरोप चुकीचे असल्याचे मान्य करू,असेही केजरीवाल म्हणाले. दुसरीकडे, आपच्या नेत्यांनी यमुनेच्या पाण्याच्या बॉटल्स भाजप मुख्यालयात पाठवल्या आहेत.

८५०० कोटींचा निधी, तरीही यमुना अस्वच्छ-भाजप

अरविंद केजरीवाल दिल्लीत १० वर्षांपासून सत्तेत असतानाही त्यांनी यमुनेतील प्रदूषण रोखले नाही.भ्रष्टाचार, खोटे आरोप व पोकळ आश्वासनांच्या पलीकडे त्यांनी काहीही केले नाही,असा टोला भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लगावला. केंद्र सरकारने ८,५०० कोटींचा निधी दिला.तरीही यमुना नदी स्वच्छ करण्याचे सार्थक काम केजरीवालांनी केले नसल्याची टीका त्यांनी केली.

यमुनेचे पाणी विषारी बनल्याचा केजरीवालांचा आरोप खोटा असून ते दिल्लीकरांच्या मनात दहशत निर्माण करीत आहेत.त्यांनी देशविरोधी शक्तींशी हात मिळवणी केली, असा आरोप भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला.

Sushant Kulkarni