राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत.

त्या पीडितेच्या कुटुंबियांना मी भेटणार आहे व आज मला कोणतीही ताकद रोखू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते.

परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात रोखून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती. पोलिसांनी राहुल गांधी यांची गचांडी पकडली होती, कॉलर पकडून त्यांना जमिनीवर खाली पाडले होते आणि कार्यकर्त्यांवर लाठीमारही केला होता.

त्यामुळे देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टिकेची झोड उठली होती. राहुल गांधी आज दुपारी हाथरसला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदारदेखील असतील. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करेल.

या सरकारने पीडितेच्या कुटुंबाला न्यायापासून वंचित ठेवलं आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच हे सरकार पोलीस बळाचा वापर करुन मीडियालादेखील पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही. दरम्यान, हाथरस घटनेवरुन राहुल गांधी उत्तर प्रदेश सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

यूपी सरकारविरोधात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी पीडितेच्या गावच्या सीमा सील केल्या आहेत. पोलिसांचे वर्तन अशा अनेक बांबीवरुन राहुल गांधींनी ट्वीट करुन स्वतःचं मत मांडलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24