अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- कॅपिटल टू रिस्क असेट्स रेशो (सीआरएआर) नऊ टक्क्यांहून अधिक असलेल्या सहकारी बँकांना त्यांचे भाग भांडवल परत करण्याचा अथवा कर्जात वळते करण्याचा पर्याय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देऊ केला आहे.
त्याचा फायदा सहकारी बँकांमधील कर्जदारांना होणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे समभाग शेअरबाजाराशी निगडीत असतात. तर सहकारी बँकांचे समभाग कर्जाशी संलग्न असतात.
सहकारी बँंकांमधील कर्ज प्रकारानुसार कर्जाच्या अडीच ते तीन टक्के रक्कम समभाग म्हणून ठेवावी लागते. आरबीआयने समभागांवर लाभांश देण्यास मनाई केली आहे.
तसेच, समभाग परतही देता येत नव्हते. त्यामुळे कर्जदारांबरोबर वादाचे प्रसंग घडत होते. म्हणून, नागरी सहकारी बँंक संघटनांकडून भाग भांडवलाची रक्कम परत देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने ९ टक्क्यांहून अधिक सीआरएआर असलेल्या बँकांना जून २०२० पासून भागभांडवल रक्कम परत देण्यास हरकत नसल्याचा आदेश नुकताच काढला आहे.