Pm Ujjwala Yojana:- केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्वला योजना ही एक खूप महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवर सरकारच्या माध्यमातून 300 रुपये सबसिडी दिली जाते. सात मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जे काही अनुदान दिले जाते त्याची मुदत आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली व त्यामुळे देशातील कोट्यावधी कुटुंबांना यामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
साधारणपणे संपूर्ण देशामध्ये दहा कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा फायदा मिळतो. एवढेच नाही तर झालेल्या या बैठकीमध्ये मिळणारे अनुदानित सिलेंडरच्या संख्येमध्ये देखील वाढ करण्यात आली असून अगोदर एका वर्षात साधारणपणे 10 सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळत होते. परंतु आता दहा ऐवजी हे अनुदान आता बारा सिलेंडरला मिळणार आहे.
उज्वला योजनेअंतर्गत अनुदानच नाहीतर गॅस सिलेंडर आणि शेगडी देखील मिळते मोफत
पंतप्रधान उज्वला योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी मोफत दिली जाते. या माध्यमातून जे काही तीनशे रुपयांचे अनुदान मिळते ते देखील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाते.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून देशात 9.6 कोटींपेक्षा जास्त गॅस कनेक्शन वाटण्यात आलेले आहेत व ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाने आणखी 75 लाख लाभार्थी या योजनेला जोडण्यास मंजुरी दिली होती.
कोणाला मिळतो उज्वला योजनेचा लाभ?
1- या योजनेसाठी अर्जदार या महिला असणे गरजेचे आहे.
2- अर्जदार महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
3- अर्जदार महिलाही बीपीएल कुटुंबातील असावी.
4- अर्जदार महिलेकडे बीपीएल कार्ड आणि रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.
5- घरामध्ये एलपीजी कनेक्शन अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर नसावे.
स्थलांतर झाले तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो का?
बरेच व्यक्ती काम व व्यवसायानिमित्त स्थलांतर करत असतात. परंतु अशा स्थलांतर झालेल्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची गरज भासत नाही. यामध्ये गरजू कुटुंबे स्वतःची पडताळणी करून अर्ज देऊन योजनेचा लाभ मिळवू शकतात.
अशा पद्धतीने अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या
1- तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेचे अधिकृत वेबसाईटला pmuy.gov.in/ujjwala2.html भेट देणे गरजेचे आहे.
2- या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्याचा एक पर्याय दिसतो.
3- हा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर या फॉर्म मध्ये जी माहिती विचारलेली आहे ती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे.
4- फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तुमच्या नजीकच्या एलपीजी गॅस केंद्रावर तो फॉर्म तुम्हाला जमा करावा लागेल.
5- तसेच यासाठीची महत्त्वाची कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावे लागतील.
6- त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी कनेक्शन मिळते.