अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- झारखंडच्या आदिवासीबहुल पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात पत्थलगडी समर्थकांनी पंचायत समितीच्या एका सदस्यासह सात गावकऱ्यांची बेदम मारहाण करून निघृर्ण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.
या सर्वांचे विद्रुप व रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. या घटनेने आदिवासी भागातील गत काही वर्षांत तोंड वर काढणारी पत्थलगडी चळवळ पुन्हा वादात सापडली आहे.
वरील हत्याकांडासंदर्भात अधिक माहिती अशी की, पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या गुदडीस्थित बुरुगुलीकेरा गावात पत्थलगडी समर्थकांनी आपल्या प्रतिद्वंद्व्यांना जिवे मारण्याचा प्रताप केला आहे.
गेल्या आठवड्यात एका बैठकीत गावचा उपसरपंच आणि पंचायत समिती सदस्य जेम्स बूढ यांनी पत्थलगडींचा विरोध केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्थलगडी समुदायाच्या लोकांनी या सदस्याला बेदम चोप दिला.
याचदरम्यान नऊ जणांचे अपहरण करून त्यांना जंगलात नेण्यात आले. यापैकी सात जणांची काठी, दांडू आणि कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली.
बुरुगुलीकेरा गावापासून ४ किमी दूर जंगलात या सात जणांचे विद्रुप आणि रक्ताने माखलेले मृतदेह पोलिसांना आढळून आले होते.