अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- लहान मुलांच्यात मारामारी झालेली तुम्ही ऐकली असेल. पण उत्तर प्रदेशमध्ये मारामारीतच एका मुलाने दुसऱ्याची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलाने आपल्या सहकारी विद्यार्थ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वर्गात बसण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला होता. १४ वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून, परवाना असलेली बंदूक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. हे दोन्ही विद्यार्थी दहावीत शिकत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना घडली तेव्हा वर्गात शिक्षक शिकवत होते.
अचानक गोळी झाडल्याचा आवाज ऐकून सारेच स्तब्ध झाले. वर्गात उपस्थित असलेल्या अन्य विद्यार्थ्यांनी ही घटना पाहिल्यावर फारच गोंधळ केला. याचा फायदा घेत अल्पवयीन मुलगा निसटण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, अन्य शिक्षकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याचे समजते. दोन मुलांमध्ये मारहाण होऊन तिसऱ्याचा बळी जाण्याची ही घटना दुर्दैवीच आहे.बुधवारी दोन मुलांमध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरून वाद झाला. यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मात्र, आरोपी विद्यार्थी इतका रागात होता की, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी बंदूक घेऊन शाळेत आला.
ही बंदूक आरोपी विद्यार्थ्यांच्या काकांची असून, ते सेनेत कार्यरत आहेत. काका सध्या सुट्टी घेऊन घरी आले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी पुढे सांगितले की, सकाळी ११ वाजता वर्ग सुरू होताच आरोपी विद्यार्थ्याने दप्तरातून बंदूक काढली आणि सहकारी विद्यार्थ्यावर तीन गोळ्या झाडल्या.
एक गोळी विद्यार्थ्याच्या डोक्यावर लागली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य दोन गोळ्या छातीवर आणि पोटात लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोळी झाडून जेव्हा मुलगा फरार होण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाच शिक्षकांनी त्याला पकडले. शिक्षकांशीही विद्यार्थ्याने झटापट करत गोळी झाडण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती शालेय व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने शाळेत जाऊन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.