सबंध भारतामध्ये महत्वाच्या शहरांमधील आणि राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोठ मोठ्या रस्ते प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर असून दिल्ली- मुंबई सारख्या एक्सप्रेसवेचे काम देखील आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. त्यासोबतच अनेक नवीन रेल्वे मार्गांचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहे.
जलद कनेक्टिव्हिटी आणि वेगवान प्रवासाच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेन्स देखील भारताच्या विविध राज्यांतील शहरे जोडण्यासाठी उपयुक्त ठरताना दिसून येत आहेत. यासोबतच देशातील पहिला वहिला बुलेट ट्रेन मार्गाचे बांधकाम देखील सुरू असून ते नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून सुरू आहे
व मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ही बुलेट ट्रेन सुरू होणार असून 2026 मध्ये ती प्रत्यक्षात धावेल असा रेल्वेचा प्रयत्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच बुलेट ट्रेनच्या आणखी काही नवीन मार्गांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई- नासिक- नागपूर या बुलेट ट्रेन मार्गाचा समावेश आहे.
धावणार मुंबई ते नागपूर व्हाया नासिक बुलेट ट्रेन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या देशातील पहिल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोरात सुरू असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी काही बुलेट ट्रेनच्या नवीन मार्गांची घोषणा केली असून यामध्ये मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक आणि मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेन मार्गांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भाजपाच्या माध्यमातून जो काही जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यामध्ये सुरू असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग सोबतच आणखी दहा मार्गांवर बुलेट ट्रेन धावतील अशी घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आलेली आहे.
देशातील प्रमुख असलेले देशाची राजधानी दिल्ली तसेच महाराष्ट्राची आणि देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर अहमदाबाद बरोबर आता आणखी सहा मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
या सहा मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू केल्यानंतर त्याचा व्यावहारिक ताळमेळ कसा बसेल या संदर्भात अहवाल देखील तयार करण्यात आला असून या सहा बुलेट ट्रेन मार्गांपैकी दोन बुलेट ट्रेन मार्गांचा डीपीआर तयार करण्याचे काम या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणार आहे.
यामध्ये ज्या मार्गांवर बुलेट ट्रेन संदर्भात चाचपणी केली जात आहे त्यामध्ये मुंबईतून जाणारे दोन मार्ग असून या मार्गांच्या बांधणी संदर्भातला अहवाल देखील तयार करण्यात आला आहे. तसेच दिल्ली ते अमृतसर, हावरा- वाराणसी – पाटणा, दिल्ली- आग्रा- लखनऊ- वाराणसी, दिल्ली- जयपूर -उदयपूर -अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील मुंबई- नासिक- नागपूर आणि मुंबई ते हैदराबाद या मार्गांचा समावेश असून या मार्गांचा देखील बांधणी संदर्भातला अहवाल तयार करण्यात आला आहे.
मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या नंतर हावरा ते वाराणसी आणि दिल्ली ते अमृतसर या बुलेट ट्रेन संदर्भातील काम सुरू होईल व लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर या संदर्भातला सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर तयार करायला सुरुवात केली जाणार आहे व हे काम सहा ते आठ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल.