Steel Man of India : काही लोकांमध्ये जन्मतःच काही गुण असतात की, जे सर्वसामान्यांमध्ये आढळून येत नाहीत. असाच एक भारतीय तरुण आहे की जो आपल्या डोक्यावर लोखंडाच्या सळ्या ठेवून त्या दोन हातांनी वाकवतो. त्यामुळे त्याला ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते.
विस्पी खराडी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ म्हणजे त्याने केलेला गिनीज रोकॉर्ड आहे. विस्पीने एका मिनिटात आपल्या डोक्यावर एक एक करून तब्बल २४ लोखंडी सळ्या वाकवून दाखवण्याची करामत करून हा विक्रम केला आहे.
गिनीज बुकच्या वतीने ट्विटरवर नुकतीच या विक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गिनीज बुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर विस्पीचा जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये विस्पी एक एक लोखंडी सळी आपल्या डोक्यावर ठेवून आपल्या दोन हातांच्या साह्याने लिलया वाकवताना दिसत आहे.
व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे. की, विस्पीने एका मिनिटात २४ सळ्या आपल्या डोक्याच्या साह्याने वाकवून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
गिनीज बुकने याच महिन्यात १७ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या हा व्हिडीओ आतापर्यंत ५३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याला चारशे लाईक्स मिळाल्या आहेत.