अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून उपोषण करणार होते.
मात्र, त्यापूर्वी दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी हजारेंची भेट घेतली आणि त्यानंतर हजारेंनी आपले आंदोलन स्थगित केले.
यावरून अण्णांवर टीकेची झोड उडाली आहे. ‘अण्णांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढायचं आणि नंतर ते म्यान करायचं असं यापूर्वीही घडलं आहे. त्यामुळं आताही ते घडलं तर त्यात अनपेक्षित असं काही नाही.
या शब्दात शिवसेनेच मुखपत्र सामनामधून देखील अण्णांचा समाचार घेतला आहे. त्यातच आता एका सिनेनिर्मात्याने देखील अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे.
चित्रपट निर्माते हंसल मेहता हे एकेकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचेही समर्थक राहिले आहे. परंतु आता त्यांनी अण्णा हजारे यांना पाठिंबा देणे आयुष्यातील दोन चुकांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
हंसल मेहता यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ‘चांगल्या भावनेने आणि चांगल्या हेतूने मी त्यांचे (अण्णा हजारे) समर्थन केले होते. त्यांनी मी अरविंद केजरीवाल (दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री) यांचेही समर्थन केले होते.
मला याचा खेदही वाटत नाहीये. प्रत्येक जण काही ना काही चुका करत असतो. मी देखील ‘सिमरन’ बनवला होता’, असे ट्विट हंसल मेहता यांनी केले आहे.
हंसल मेहता म्हणाले कि… हंसल मेहता यांनी ‘सिमरन’ चित्रपट तयार करणे आणि अण्णा हजारे यांना पाठिंबा देणे या आयुष्यातील दोन मोठ्या चुका असल्याचे म्हटले आहे.
हंसल मेहता यांनी 2017 मध्ये अभिनेत्री कंगना रणौतला घेऊन ‘सिमरन’ नावाचा चित्रपट बनवला होता, मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला होता. हा चित्रपट करणे आपली पहिली चूक होती असेही त्यांनी म्हटले.