अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- केंद्राने लागू केलेल्या कृषी कायदांबाबत गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात अनेकांचे बळी देखील गेले.
अखेर केंद्राला जाग आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. याबाबत देशभरातून प्रतिक्रिया आल्या. याच अनुषंगाने जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी मोदींचे आभार मानले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशासाठी लागू केलेले ३ कृषी कायदे रद्द केले व लोकशाहीमध्ये शेतकरी नेते, विरोधी पक्षाचा मान सन्मान राखला. तसेच वेळप्रसंगी आपला आग्रह सोडून देण्याचे धैर्य दाखविले आहे.
त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया पिचड यांनी व्यक्त केली. कायदे रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, तसेच मोदी सरकार हे हुकूमशहा नसून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहेत.
त्यांची काहींनी हुकूमशहा म्हणून तयार केलेली प्रतिमा या निर्णयामुळे पुसली जाणार आहे. मोदी हे शेतकऱ्यांच्या बाजूचे असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत, असेही माजी मंत्री पिचड यांनी म्हंटले आहे.