Maharashtra News:भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रलंबित खटले निकाली काढण्याचा धडाकाच सुरू झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केवळ चार दिवसांत विविध प्रकारची तब्बल १२९३ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये १०६ नियमित खटल्यांचा तर ४४० हस्तांतरण याचिकांचा समावेश आहे.
खुद्द सरन्यायाधीश लळित यांनीच ही माहिती दिली आहे. भारतीय वकील परिषदेतर्फे लळित यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे माहिती दिली.
ते म्हणाले, तुम्ही जेवढे खटले सर्वोच्च न्यायालयासमोर आणाल तेवढे अधिकाधिक खटले सोडवण्याचा प्रयत्न न्यायालय करेल.
सरन्यायाधीश म्हणून मिळालेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत मी माझ्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करून विधी क्षेत्रासाठी जे करता येईल ते करेन,असेही ते म्हणाले. सरन्यायाधीश लळीत हे त्यांच्या कामाच्या धडाक्याबद्दल ओळखले जातात.
न्यायायाचे काम लवकर सुरू व्हावे, प्रलंबित खटले वेळेत मार्गी लागावेत, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. न्यायालयात सर्वांत लवकर येणारे न्यायाधीश म्हणूनही ते ओळखले जातात.