लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेले तरुण आपापल्या गावी परतत आहेत. असाच दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील गावी परतल्यानंतर कोरोना चाचणी केली
नाही म्हणून त्याच्या चुलत भावांनीच त्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनजीत सिंग असं या तरुणाचं नाव आहे एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मनजीत दिल्ली येथे रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता.
काही दिवसांपूर्वी तो लॉकडाऊनमुळे आपल्या गावी मलकापूर येथे परतला होता. दिल्लीहून परतल्यानंतर त्याची थर्मल टेस्ट करण्यात आली होती.
ती निगेटिव्ह असल्याने त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले नव्हते. मनजीत गावी परतल्यानंतर त्याचे चुलत भाऊ कपिल आणि मनोज हे त्याला कोरोना चाचणी करण्याविषयी सांगत होते.
मनजीत याने मात्र कोरोना चाचणी करण्यास नकार दिला होता. त्यावर त्या तिघांमध्ये वादाची ठिणगी पडली. हळूहळू विषय हमरीतुमरीवर आला आणि मनोज व कपिलने काठ्यांनी मनजीतला मारायला सुरुवात केली.
या मारहाणीत मनजीतच्या डोक्यावर आणि खांद्याला जबर दुखापत झाली. आणि त्यातच मनजीतचा मृत्यू झाला