India News : मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाजवळ रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार पाहायला मिळाला. कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या के. के. एक्स्प्रेसने दिल्लीकडे निघण्यापूर्वी मोहोळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर काही वेळातच इंजिनला घाटणे गावाजवळ शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.के. के. एक्स्प्रेसच्या इंजिनला रविवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. रेल्वेचे इंजिन पेटल्याचे रेल्वे चालक विकासकुमार यांच्या लक्षात आले.
त्यांना मागून येणारा धूर दिसू लागला. तत्काळ विकासकुमार यांनी अतिशय धाडसाने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी करत पहिल्यांदा गाडी बंद केली. गाडी थांबल्यानंतर रेल्वे इंजिनमधून त्यांनी खाली उडी मारली.
त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. त्यात त्यांचे हात व अंग भाजले आहे. रेल्वे चालकास रेल्वेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी मोहोळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
पुढील उपचारासाठी त्याना सोलापूरला रवाना केले. दरम्यान, या मार्गावर कधीही न थांबणारी रेल्वे अचानक थांबली असून रेल्वेच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपासच्या शेतकऱ्यांनी रेल्वेकडे धाव घेत आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन यंत्रणेद्वारे आग विझवण्यासाठी प्रयत्न झाले. सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती होती. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिशय कठीण प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल घाटण्याचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गावकरी व आसपासच्या नागरिकांचे आभार मानले.