अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- भारत बायोटेकने विकसित केलेली कोरोनावरील स्वदेशी लस कोव्हॅक्सिन सुरक्षित असल्याचे ‘द लँसेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांच्या निष्कर्षाच्या आधारावर लस सुरक्षित असून, तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत. तसेच या लसीच्या डोसमुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतादेखील वाढते, असे ‘द लँसेट’मध्ये म्हटले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांशिवाय देशात या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्यामुळे अनेक जण आक्षेप घेत आहेत.
लसीकरणासाठी निवडण्यात आलेले अनेक वैद्यकीय कर्मचारी कोव्हॅक्सिनऐवजी कोविशिल्डचा डोस देण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लँसेट’च्या दाव्याला विशेष महत्त्व आहे.
पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिनची देशातील ११ रुग्णालयांमध्ये चाचणी करण्यात आली. या चाचणीत १८ ते ५५ वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.