अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- सबंध भारतात प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडत असताना दिल्लीमध्ये शेतकरी बांधवांनी आंदोलनाला आज तीव्र स्वरूप दिले.
भारतीय संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचा मोदी सरकारचा डाव देशातील शेतकरी आणि देशवासीय एकजुटीने हाणून पाडतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष काळे यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले.
यावेळी ते बोलत होते. झेंडावंदनापूर्वी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर दीप चव्हाण, शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेसचे नेते फारुख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
काळे म्हणाले की, भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी लाखो-करोडो देशवासीयांनी बलिदान दिले. ब्रिटिशांची राजवट उलथवून लावली. पण सध्या मोदी सरकार हे आपल्या स्वकिय शेतकरी बांधवांच्या जीवावर उठले आहे. मागील सुमारे दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवरती काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव तळ ठोकून आहे.
अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये प्राण गेले आहेत. आज मात्र शेतकऱ्यांचा बांध तुटला आणि दिल्लीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलन हाताळत असताना मोदी सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण ही देशवासीयांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे, असे भावनिक उदगार यावेळी काळे यांनी काढले.
काँग्रेस पक्ष सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नगर शहरात देखील काँग्रेस पक्षाचे वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वेळोवेळी निदर्शने, आंदोलने, सत्याग्रह करण्यात आला आहे. संविधान हे सर्वोच्च असून त्याची कोणत्या परिस्थितीत पायमल्ली होऊ द्यायची नाही ही जबाबदारी काँग्रेस कार्यकर्ते समाजाला बरोबर घेऊन पार पाडतील,
असा विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला. सेवादल काँग्रेसच्यावतीने झेंडावंदन कार्यक्रमाचे संचलन कॅप्टन रिजवान शेख यांनी केले. यावेळी महिला सेवादलच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, एनएसयुआय शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे,
क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, निजाम जहागीरदार, खलील सय्यद, अनंतराव गारदे, रियाज शेख, आय.जी. शहा, मोहनराव वाखुरे, सुजित जगताप, साहिल शेख, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, नलिनीताई गायकवाड, नीता बर्वे, सुनिता बागडे, जरीना पठाण,
उषा भगत, शबाना सय्यद, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे, दानिश शेख, ॲड.चेतन रोहकले, ॲड.अजित वाडेकर, अन्वर शेख, मुबीन शेख, गणेश आपरे, प्रशांत वाघ, शंकर आव्हाड, सिद्धेश्वर झेंडे, ॲड. सुरेश सोरटे, डॉ.साहिल सादिक, नासिर बागवान, अजय मिसाळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.