IMD Rain Alert : सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. मात्र हवामानात बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील १० राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजपासून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसानानंतर थंडी पुन्हा एकदा वाढणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पावसाच्या वातावरणामुळे थंडीपासून काही काळ दिलासा मिळू शकतो.
भारतीय हवामान खात्याने 23 ते 26 जानेवारी दरम्यान पर्वतांवर पाऊस आणि बर्फवृष्टी दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर भारतातील पर्वतांपासून ते मैदानी प्रदेशापर्यंत थंडीचा कहर सुरु आहे. मात्र तापमानात बदल झाल्याने काही प्रमाणात येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आजपासून पुन्हा हवामान बदलणार असल्याने थंडी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
काही भागात बर्फवृष्टी सुरु आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतांवर गेल्या अनेक दिवसांपासून बर्फवृष्टीसह पाऊस पडत आहे. २३ ते २६ जानेवारी दरम्यान बर्फवृष्टीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 23 ते 26 जानेवारी दरम्यान हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पावसानंतर थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
स्कायमेट खाजगी हवामान खात्यानुसार, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील 24 ते 48 तासांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. दुसरीकडे, 24 ते 28 जानेवारी दरम्यान लडाख, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.