अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या एक कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. देशात 99 लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या देशभरात 3.35 लाखांहून अधिक सक्रिय कोरोना केसेस आहेत.
देशात आतापर्यंत 1.43 लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तरी देखील नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या 24 तासांत देशात 22,065 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 354 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
सध्या स्थितीला देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 99,06,165 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,43,709 इतका झाला आहे.
काल दिवसभरात 34,477 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 94,22,636 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
आता दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी एकूण रुग्णसंख्या 99 लाखांच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही वर्तविली जात आहे.