Indian Railway : रेल्वेचे जाळे २ हजार ३३९ किमीने वाढणार ! ७ प्रकल्पांना मंजुरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway : भारतीय रेल्वेच्या सेवांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ७ प्रकल्पांना मंजुरी दिली. यात राज्यातील मुदखेड -मेडचल- मेहबूबनगर – ढोण या मार्गाचा समावेश आहे.

एकूण ३२,५०० कोटी रुपयांच्या सात रेल्वे प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे रेल्वेची मालवाहतूक वाढणार आहे.

भारतीय रेल्वेच्या ७ मल्टी- ट्रॅकिंग प्रकल्पांसाठी ३२,५०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे प्रकल्प पूर्णपणे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम मोडवर बांधले जातील, तसेच या प्रकल्पांद्वारे भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये २,३३९ किमीची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यांतील ७.०६ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुदखेड – ढोण दुहेरीकरण प्रकल्प (४१७.८८ किमी) अंदाजे ४,६८६.०९ कोटी रुपये खर्चाचा असणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे सेवा सुरळीत होईल. गर्दी कमी करून रेल्वेच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

प्रस्तावित प्रकल्पामुळे विभागाची विद्यमान लाइन क्षमता वाढेल. वक्तशीरपणा, तसेच वॅगन टर्नअराऊंड वेळेत सुधारणा होईल. मुदखेड -मेडचल- महबूबनगर-ढोण विभागाचे दुहेरीकरण केल्याने बल्हारशाह – काझीपेठ-सिकंदराबाद आणि काझीपेठ-विजयवाडादरम्यानची वाहतूक कोंडी कमी होऊ शकते.

या सात नव्या रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या ९ राज्यांमधील ३५ जिल्ह्यांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे.

यामुळे रेल्वेचे जाळे २ हजार ३३९ किमीने वाढणार आहे. अन्नधान्य, खते, कोळसा, सिमेंट, राख, लोखंड आणि तयार पोलाद, क्लिंकर, कच्चे तेल, चुनखडी, खाद्यतेल इ. विविध मालाच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत.

क्षमतावाढीच्या कामांमुळे २००- एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष ) क्षमतेची अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्याने हवामानासंबंधित उद्दिष्टे साध्य करणे आणि देशाच्या मालवाहतूक खर्चात कपात करणे या दोन्हींसाठी मदत होईल.

९ राज्यांतील रेल्वेमार्गांच्या प्रकल्पांमध्ये गोरखपूर- कॅण्ट-वाल्मिकी नगर मार्गिकेचे दुहेरीकरण, सोन नगर- आंदल मल्टी ट्रैकिंग प्रकल्प – मल्टी ट्रॅकिंग, नैरगुंडी-बरंग आणि खुर्दा रोड – विजियानगरम-तिसरी मार्गिका,

मुदखेड -मेडचाळ आणि महबूबनगर – ढोणे- विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, गुंटूर- बिबीनगर विद्यमान रेल्वे मार्गाचे – दुहेरीकरण, चोपण – चुनार- विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व समखियाली – गांधीधाम यांचा समावेश असणार आहे.