Categories: भारत

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, अडाणी डॉक्टर उपचार करत असल्याने परिस्थिती सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, असा घणाघात करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

आत्ममग्न असलेले हे सरकार इतर कोणाचाही सल्ला घेण्यास तयार नसल्याचेही ते म्हणाले. राज्यसभेत सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना चिदंबरम यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भाजपकडे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केला.

मोदी सरकारचे चार वर्षे आर्थिक सल्लागार राहिलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांनी अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये दाखल झाल्याचे सांगितले आहे. मात्र, मी म्हणेन की, या सरकारने पेशंटला आयसीयूच्या बाहेरच ठेवले आहे. अडाणी डॉक्टर उपचार करत असून, आसपासचे लोक सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासच्या घोषणा देत आहेत. हे गंभीर आहे.

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया हे सक्षम डॉक्टर देश सोडून गेले आहेत. हे सरकार विरोधी पक्षांचा सल्ला घेण्यास तयार नाही. मग सरकारने निदान त्यांचा डॉक्टर तरी सांगावा, असे चिदंबरम म्हणाले.

सध्या बाजारात मागणीचा तुटवडा आहे, लोकांच्या हाती पैसा नाही, अशा परिस्थितीत गुंतवणुकीची गरज आहे, असे असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन कॉर्पोरेट कर कमी करून २०० उद्योजकांच्या हाती पैसा देत आहेत, असा आरोप चिदंबरम यांनी केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24