IMD Rain Alert : मार्च महिन्यात उष्णता हळूहळू वाढायला सुरुवात होते मात्र यावेळी मार्च महिन्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तसेच अजूनही पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दिवसभर कडक उन्हामुळे वातावरणातील उष्णता झपाट्याने वाढू लागली आहे. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच १६ ते १९ मार्च या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
आज दिल्ली-एनसीआर, राजस्थान, महाराष्ट्रासह सुमारे 10 राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये आज पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये आजपासून पुढील चार दिवस म्हणजे १९ मार्चपर्यंत पावसाची शक्यता आहे. 17 ते 19 मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान जोरदार वादळ आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
IMD ने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागात पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर पंजाब, हरियाणा, दिल्ली-NCR आणि हिमालयीन प्रदेशासह अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम हिमालयात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही भागात अधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट हवामान खात्यानुसार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर पश्चिम आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांची काढणी सुरु असताना आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पिके भूईसपाट झाली आहेत. गहू, हरभरा आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.