अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव स्वीकारला. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं जबरदस्त पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.
अजिंक्यच्या नेतृत्व कौशल्याचे सर्वच कौतुक करत आहेत. टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्यकडे सोपवावे, असे अनेकांनी मत व्यक्त केले. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानंही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे आणि संपूर्ण संघाचे कौतुक केले आहे.
विराट कोहली बाप होणार असल्यामुळे त्याने दुसऱ्या सामन्यापासून रजा घेतली. त्यामुळे विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत अजिंक्यनं ज्या कौशल्यानं संघाचे नेतृत्व केलं, ते पाहून तेंडुलकरही इम्प्रेस झाला.अजिंक्यनं या सामन्यात ११२ धावांची खेळी करून संघाला आघाडी मिळवून दिली आणि त्याच जोरावर ऑस्ट्रेलियाच्या १९५ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं ३२६ धावा करून १३१ धावांची आघाडी घेतली.
या विजयानंतर तेंडुलकर PTIशी बोलताना म्हणाला,”भारतीय संघानं उल्लेखनीय कामगिरी केली.अजिंक्यच्या नेतृत्वाचेही त्याने तोंडभरून कौतुक केले. संघातील वरिष्ठ खेळाडू आणि त्यांनी दिलेलं योगदानही महत्त्वाचे होते. अजिंक्यची फलंदाजी उल्लेखनीय झाली. तो शांत आणि एकाग्र होता.
त्याचा खेळ आक्रमक होता, परंतु त्यान आक्रमकता आणि संयम याचा योग्य ताळमेळ राखला.” तेंडुलकरने अजिंक्य व विराट कोहली यांच्यातील तुलनेबाबत सांगितले की ,” विराट व अजिंक्य यांच्यामध्ये तुलना करता कामा नये. या दोघांमध्ये मोठा फरक आहे.
मी चाहत्यांना सांगू इच्छितो की, अजिंक्य व विराट हे दोघेही भारतीय आहेत आणि ते टीम इंडियासाठी खेळतात. कोणत्याही खेळाडू किंवा कर्णधारापेक्षा देश किंवा संघ नक्कीच मोठा असतो. देश किंवा संघाचाच अधिक विचार करायला हवा.”त्यामुळे तेंडुलकरने मांडलेल्या मताचा चाहत्यांमधून आदर केला जात आहे.