Weather Update : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या महिन्यामध्ये उष्णतेत वाढ होत असते. मात्र हवामानात बदल झाल्याने तापमानात घट झाली आहे. आता भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पण येत्या काही दिवसांत उष्णतेत वाढ होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात दिल्लीसह देशातील अनेक भागात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत तापमानात ३ ते ५ अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागा, गहू, हरभरा यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच आता पुन्हा एकदा जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांची काढणी लवकरात लवकर करावी लागेल. अन्यथा मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालय पश्चिम बंगालच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
बिहार, झारखंड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गडगडाट झाला. इतकेच नाही तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्येही हलका ते मध्यम पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्र, वायव्य राजस्थान, दक्षिण छत्तीसगड आणि नैऋत्य पंजाबमध्ये अनेक ठिकाणी गडगडाट होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ईशान्य भारतातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.