India News : जगभरात पेट्रोलियम उत्पादनांचा सध्याच्या परिस्थितीप्रमाणेच बेसुमार वापर कायम राहिला तर आगामी ५० वर्षांत जगातील कच्च्या तेलाचे साठे संपुष्टात येतील, अशी भविष्यवाणी केंद्र सरकारने सोमवारी केली. भारतासह अनेक देशांनी स्वच्छ ऊर्जास्रोतांचा विकास, त्यांचा वापर आणि इलेक्ट्रॉनिक वाहने स्वीकारण्यावर भर दिल्याचेही सरकारने स्पष्ट केले.
राज्यसभेत एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लिखित उत्तर दिले. यात ते म्हणतात की, ‘एनर्जी इन्स्टिट्युट (ईआय) स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी- २०२३’ या अहवालात सध्याचे तेलसाठे व त्यांचे उत्पादन यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस भांडार वापरण्याचे प्रमाण बदलले नाही. हे प्रमाण असेच कायम राहिल्यास कच्चे तेल ५३.५ वर्षे आणि नैसर्गिक गॅस ४८.८ वर्षांपर्यंत पुरेल, असे त्यांनी उत्तरात नमूद केले.
जैव इंधन, संपीडित जैव गॅस, हरित हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जास्त्रोतांचा विकास आणि त्याचा वापर तथा हायड्रोकार्बन प्रतिस्थापित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दिशेने जागतिक पातळीवर अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत, असे तेली यांनी सांगितले.
पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन सध्याच्या वेगाने कायम राहिले तर जगातील तेलाचे साठे ५० वर्षांत संपुष्टात येतील. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नैसर्गिक गॅस, जैव इंधन, संपीडित जैव गॅस, हरित हायड्रोजन व स्वच्छ ऊर्जास्रोत वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
पेट्रोलियम पदार्थांमध्ये इथेनॉल व डिझेलमध्ये जैव डिझेलचे मिश्रण वाढवणे, स्वस्त वाहतुकीसाठी दीर्घकालीन पर्याय अंतर्गत संपीड़ित जैव गॅस संयंत्र स्थापन करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे रामेश्वर तेली यांनी सांगितले.