अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : पुत्र प्राप्तीबाबत केलेले वादग्रस्त विधान कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) चांगलच भोवलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजा विरोधात संगमनेर येथे गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. या दाखल खटल्याची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ती आता १६ सप्टेंबरला होणार आहे. मात्र, या प्रकरणात मूळ तक्रारदार असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. रंजना गवांदे यांनीही वकीलपत्र सादर केले आहे.
पुढील सुनावणीच्या वेळी सरकार पक्षासोबतच त्यांनाही बाजू मांडता येणार आहे. कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदोरीकरांविरुद्ध संगमनेरच्या न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. त्याला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या खटल्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
त्यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. आज सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. बी. जी. कोल्हे हजर झाले. तसेच अॅड. गवांदे यांनीही या प्रकरणात आपल्याला बाजू मांडायची असल्याचे सांगत तसा अर्ज सादर केला. गवांदे या प्रकरणातील मूळ तक्रारदार आहेत.
या घटनेची केवळ चर्चा सुरू असताना त्यांनीच प्रथम अधिकृत तक्रार आणि व्हिडिओसंबंधीचे पुरावे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सादर केले होते. नुकतीच जिल्हास्तरीय पीसीपीएनडी सल्लागार समितीची बैठक झाली. सरकारी वकीलांशी समन्वय ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे विधी सल्लागार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
आज तेही कोर्टात उपस्थित होते. अर्जावरील सुनावणीचे कामकाज आज होऊ शकले नाही. आता त्यावर १६ सप्टेंबरला कामकाज होणार आहे.
दरम्यान, ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved