अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :-  गेली अनेक दिवस सर्जेपुरा – रामवाडी परिसरातील पोल वरील दिवे बंद असून त्याचा निषेध म्हणून पोलवर टेंबे लावून महानगरपालिकेचा परिसरातील नागरिकांनी निषेध नोंदविला.

गेल्या अनेक दिवसांपासून रामवाडी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मात्र या मशाल आंदोलनाने हा परिसर उजळून निघाल्याचे रात्री दिसत होते . रामवाडी हि शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी या परिसराची लोकसंख्या काही हजाराच्या घरात आहे.

विविध समस्यांनी हा परिसर ग्रासलेला,आहे. अंधाराच्या साम्राज्या बरोबरच या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे झालेले अर्धवट काम आणि स्वच्छतेची दुर्दशा, असा परिस्थितीत परिसरातील नागरिक जीवन कंठत आहेत.

काल रात्री केलेल्या टेंबे आंदोलनाने तरी महानगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.त्याच बरोबर इतर समस्यांचे निराकरण करावे अशी या परिसरातील लोकांची मागणी आहे.

या परिसरात स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याने या परिसराला कोणी वाली आहे का नाही असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्यामुळे येथील समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

तरी पालिका प्रशासनाने या परिसरातील समस्यांचे तातडीने निराकारण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात विकास उडाणशिवे,

सलीम पठाण , सोमनाथ लोखंडे, आलीम शेख, वाजिद शेख, ईलियास शेख,विकास धाडगे, समदभाई तांबोळी , सचिन साळवे, अमोल साबळे ,आदींनी सहभाग घेतला.