मुंबई : राज्यत सध्या भोंग्याचे राजकारण सुरु आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना (Islam Gymkhana) येथे इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. तसेच ते औरंगाबाद (Aurangabad) येथे १ मी रोजी भव्य सभा देखील घेणार आहेत. भाजपने (BJP) राज ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे.

शरद पवार म्हणाले, “देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे.

दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे.

राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे शरद पवार म्हणाले आहेत.

कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार आहे. पण लोकांना बोलावणे आणि आपापसातील संबंध संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही. असे काम काही राजकीय नेते करत आहे असे म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, मला आनंद आहे की आज इफ्तार पार्टी होत आहे. गेली दोन वर्षे जगात करोनाचे सावट आले होते. त्यामुळे उत्सव साजरा करायला मिळाला नाही.

लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज करोना समस्या कमी झाली आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रोजा इफ्तार स्वीकारला आहे असेही ते म्हणाले आहेत.