महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सध्या समाजातील अनेक घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत व आधीपासून काही योजना सुरू देखील आहेत. परंतु या योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे असते.
कारण बऱ्याचदा अशा योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही व अनेक लाभार्थी पात्र असून देखील अशा योजना पासून दूर राहतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा व शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचाव्यात
व दुसरे म्हणजे या सरकारी योजनांचा प्रचार करता यावा याकरिता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी 50 हजार जागांवर भरती आयोजित करण्यात आलेली असून याकरिता ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा आणि मुलाखतीविना उमेदवारांची निवड थेटपणे केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या कार्यक्रमाचा लाभ घेऊन तुम्ही देखील तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरांमध्ये राहूनच काम करून पैसे मिळवू शकतात.
मिळेल महिन्याला दहा हजार रुपये मानधन
यामध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाईल अशा उमेदवारांना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महिन्याला दहा हजार रुपये पगार दिला जाणार असून याकरिता सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे.
परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की या करारामध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढ करण्यात येणार नाही व अशा उमेदवारांना सरकारी सुविधांचा लाभ देखील दिला जाणार नाही याचे नोंद घेणे गरजेचे आहे.
काय आहे या पदासाठी आवश्यक पात्रता?
1- या योजनेच्या माध्यमातून ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते उमेदवार 18 ते 35 वर्षे वयोगटातील असावे.
2- महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
3- तसेच अशा उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे व संगणकाचे कौशल्य असणे देखील आवश्यक आहे.
4- उमेदवाराकडे अद्ययावत असलेला मोबाईल असणे गरजेचे आहे.
5- तसेच उमेदवाराकडे आधार कार्ड देखील असावे व आधार कार्डला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक असणार आहे.
कुठली लागतील कागदपत्रे?
1- यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड गरजेचे आहे.
2- शिक्षणाचा पुरावा म्हणून पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असावे.
3- उमेदवाराकडे रहिवाशी दाखला असावा.
4- वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देखील असणे गरजेचे आहे.
5- तसेच उमेदवाराकडे पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे असून उमेदवाराचे हमीपत्र देखील असावे.
नियुक्ती झाल्यानंतर काय काम करावे लागेल?
यामध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाईल अशांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहावे लागेल व जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती त्यांना दिली जाणार आहे.
यामध्ये प्रशिक्षित योजना दूत त्यांना ज्या ठिकाणी नेमण्यात येईल त्या ठिकाणी समक्ष जाऊन जी कामे ठरवून दिलेली असतील ती कामे पार पाडणे गरजेचे असणार आहे.
त्यामध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामीण भागातील यंत्रणांशी समन्वय करून घरोघरी शासनाच्या योजनांची माहिती होईल अशा पद्धतीने काम करावे लागणार आहे. अशा योजना दूतांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल देखील ऑनलाईन अपलोड करणे गरजेचे आहे.
या भरती करता कुठे कराल संपर्क?
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेऊन योजना दूत म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करू शकतात.